मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक आहे. मद्रास, कलकत्ता आणि मुंबई येथील विद्यापीठांची स्थापना इ. स. १८५७ मध्ये झाली होती. भारत सरकारने सर जॉन कॉलव्हिल यांच्या अध्यक्षतेखाली या विद्यापीठांसाठी एक समिती नेमली होती. १२ डिसेंबर १८५६च्या भारत सरकारच्या ठरावान्वये या समितीच्या शिफारसी स्वीकारल्या गेल्या व या विद्यापीठांची विधेयके मध्यवर्ती कायदे मंडळाने मंजूर केली. १८ जुलै १८५७ रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली.
विद्यापीठाचे आरंभीचे स्वरूप, वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करून परीक्षा घेणारी व पदवी देणारी संस्था, असे होते. त्यावेळचे मुंबई राज्याचे गव्हर्नर हे विद्यापीठाचे कुलपती होते. मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि सिंध यांचा समावेश होता; परंतु संलग्न महाविद्यालये केवळ चार-पाचच होती. मुंबईचे पहिले गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन हे मुंबई विद्यापीठाचे प्रथम कुलपती, तर मुंबई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विल्यम यार्डले हे पहिले कुलगुरू झाले. १८५७ च्या कायद्यानुसार कुलसचिवाची नेमणूक सिनेट फक्त दोन वर्षासाठी करीत असे. १९०२ साली प्रथम फर्दुनजी दस्तुर या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील गणिताच्या प्राध्यापकाची अर्धवेळ कुलसचिव म्हणून नेमणूक झाली. हे पद त्यांनी १९३० पर्यंत भूषविले. त्यानंतर ए. आर. डोंगरकेरी, टी. व्ही. चिदंबरन व का. स. कोलगे हे कायम स्वरूपाचे कुलसचिव होते. मुंबईमध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घालणारे डॉ. जॉन विल्सन-ज्यांचे नाव एका महाविद्यालयाला दिलेले आहे. ते मुंबई विद्यापीठाच्या सीनेटचे पहिले सभासद होते. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर (दोघे प्रथम वर्ग), बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर आहेत.भारतीय विद्यापीठ अधिनियम १९०४ मध्ये मंजूर होऊन विद्यापीठाचे स्वरूप बदलेले. १९१३ सालापासून पदव्युत्तर शिक्षण देण्याचे कार्य सुरू झाले. महाविद्यालयासाठी लागणारी क्रमिक व अन्य पुस्तके तयार करणे ही कार्येही विद्यापीठाकडे आली. १९२८च्या अधिनियमानुसार विद्यापीठाच्या सीनेटची पुनर्रचना अधिक प्रातिनिधिक स्वरूपाची झाली. पदव्युत्तर शिक्षण व संशोधन हे विद्यापीठाच्या कक्षेत आले व त्यानुसार संलग्न महाविद्यालयांतील अध्यापकांना विद्यापीठाचे अध्यापक म्हणून मान्यता देणे इ. तरतुदी करण्यात आल्या. पदवीपर्यंत शिक्षण संलग्न महाविद्यालयात व पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठाच्या विभागांद्वारे देण्यास प्रारंभ झाला. यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली.
महाराष्ट्र शासनाने १९७४ मध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कार्यप्रणालीत एकसूत्रता आणण्यासाठी कायदा केला. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात वाढ झाली. मुंबई आणि उपनगरे याखेरीज ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आणि केंद्रशासित गोवा प्रदेशातील सर्व महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न झाली. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत.
सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ ‘बॉम्बे विद्यापीठ’ (युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.
पहिल्या १७ वर्षाच्या कालावधीत विद्यापीठाची स्वत:ची इमारत नव्हती. विद्यापीठाची कचेरी टाऊन हॉलमध्ये होती. सीनेटच्या बैठका व पदवीदान समारंभही तेथेच होत. १८६९ मध्ये कावसजी जहांगीर रेडीमनो यांनी विद्यापीठास इमारतीसाठी एक लक्ष रुपयांची देणगी दिली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहास ‘सर कावसजी जहांगीर हॉल’ असे नाव देण्यात आले. १८६४ मध्ये प्रेमचंद रायचंद यांनीही दोन लाख रुपयांची देणगी ग्रंथालयासाठी दिली. काही काळानंतर प्रेमचंद यांनी आपल्या मातोश्री राजाबाई यांच्या स्मरणार्थ टॉवर बांधण्यास आणखी २ लाख रुपये दिले. विद्यापीठाच्या वाढत्या कार्यक्षेत्रामुळे जुनी जागा अपुरी पडू लागली व विद्यापीठाच्या काही विभागांचे काम सांताक्रूझ येथील ‘विद्यानगरी’ येथून सुरू झाले. सध्या विद्यापीठाच्या एकूण ३४ इमारती आहेत. चार इमारतींचे बांधकाम चालू आहे व १२ इमारती बांधावयाची योजना तयार आहे.न्यायमूर्ती रानडे, फिरोजशहा मेहता, गोपाळकृष्ण गोखले, दिनशा वाच्छा, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, काळकर्ते शि. म. परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, रा. गो. भांडारकर, बाळशास्त्री जांभेकर, केरुनाना छत्रे असे अनेक देशभक्त, विद्धान व संशोधक हे मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडले होते.
१८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली. विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १६ जून ते १४ मार्च असे असून अध्ययन व अध्यापनाचे माध्यम इंग्रजी आहे. पण मराठी, गुजराती, हिंदी या भाषा माध्यमांतून उत्तरपत्रिका लिहिण्याची अनुमती आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, मानवशास्त्र, वैद्यक, तंत्रविद्या, दंतवैद्यक इत्यादी १४ विद्याशाखा आहेत. हल्ली कला, विज्ञान, वाणिज्य, विधि, वैद्यक, आयुर्वेद, दंतवैद्यक, ललितकला व अभियांत्रिकी (तांत्रिक) विद्याशाखा कार्यान्वित आहेत. एकूण ५७ अभ्यास मंडळे असून ७ हंगामी स्वरूपाची आहेत. तसेच १६ तात्पुरत्या अभ्यास समित्या इतर अभ्यासक्रमांसाठी नेमलेल्या आहेत. विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय असून त्याला जवाहरलाल नेहरू ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्या वर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
No comments: